Thursday, December 27, 2012

“आशा डोंगरी राहते योग क्षेम जेष्ठांचा वाहते






“आशा डोंगरी राहते योग क्षेम जेष्ठांचा वाहते..
भारतीय संस्कृतीने स्त्रीच्या मातृ रुपाला आदराच्या अत्त्युच्य पदावर विराजित केले.आहे . आणि भारतीय नारींनी त्या आदराला पात्र असल्याची प्रचीती वेळोवेळी दिली आहे.अशाच एका मातृ रूपाचे पुण्यप्रद दर्शन नुकतेच झाले .आशाताई सावर्डेकर आणि त्यांचे "संजीवन आरोग्य धाम "गोमंतक भूमितले मातृ भावाचे एक लीळा चरित्र.
जग वेगाने चालले आहे ,आणि गोमंतक हि ह्या जगाचा भाग असल्याने त्या वेगाने होणारी पड झड इथेही पोहोचली आहे. त्या वेगाचा पहिला दृश्य प्रत्याघात म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीची होणारी वाताहात.खर म्हणाल तर इथे पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा हेच खरे .ज्यांचा वृद्धत्वाने शारीरिक वेग मंदावला आहे त्यांना चार भिंतीच्या आड कुढतच राहावे लागते ,सर्व काही असूनही वंचित राहावे लागते आणि आपण ओझे होतोय अशी एक जाळणारी जाणीव मनात घर करायला लागते ,आणि खरे म्हातारपण इथून जाणवायला लागते .ह्यात कोणाचाच दोष नसतो ,इच्छा असूनही तरुण मुले वृद्धांबरोबर वेळ घालवू शकत नाही कारण जीवघेण्या स्पर्धेच्या जगात ती हि भरडली जाताहेत , वाढत्या महागाई मुळे सगळ्याच जणांना अर्थार्जन करावे लागते आहे जेष्ठांकडे लक्ष द्यायला इच्छा असूनही तरुण मंडळी वेळ देऊ शकत नाहीत, चार भिंतींच्या आड घर खायला उठते ,आणि मग वाटू लागते कि दीर्घायुष्य हा शाप आहे.शतायुषी भव हा आशीर्वाद नाही आणि तसे सांगणारी उपनिषदे हि फोल आहेत. समाज जीवनात जेव्हा अशी वादळे  घोंघावतात तेव्हाच संत प्रवृत्ती जागृत होते .संत काही वेगळे नसतात ते सर्व सामान्य माणसांसारखेच असतात फक्त त्यांच्यात जागृत होतो सत प्रवृत्तीचा साक्षात्कार ,आणि असे संत भारत भूमीत अनेक आहेत आणि अव्याहत निर्माण होणार आहेत
.
तुकोबांचे एक वचन आहे " जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले ....... देव तेथेचि जाणावा , हि जाण घेऊन आशा ताई नि आपले संजीवन आरोघ्याधाम सुरु केले 'आणि आज त्याचा वेलू गगनंतरी गेला आहे
.
आशा सावर्डेकर एक सुशिक्षित गोमंतकीय कन्या ,तिचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबापुरीत झाले पण आपली कर्म भूमी गोयच्या मातीतच आहे त्यांनी पक्के ठरवले होते .माणसे घडवावी लागतात ,माणुसकीचा ओजस्वी मंत्र त्यांच्या मनात फुंकावा लागतो हि आशाताईंची धारणा .जो जगण्याची धारणा देतो तो धर्म आणि ह्या धर्मावर आशा ताई पूर्ण श्रद्धा ठेवतात
.
आशा ताई चे दिवंगत पती सैन्यात होते ,त्यांच्या बरोबरच्या सहजीवानाने केवळ दोन कन्यकांची नव्हे तर एका विजगेषु वृत्तीचीही प्राप्ती झाली. सैन्यात एकसंधता आली तर प्रत्येक सैनिक सेनापती सारखा वागतो हा त्यांना त्या सहजीवनातून मिळालेला एक मौलिक संदेश.आशा ताई ह्या संघ भावनेला मनापासून जपतात आणि जोपासतात हि , आणि त्यामुळेच त्यांच्या सहकारी त्यांच्या खांद्याला खांदा लाऊन काम करताहेत
.
श्रीमती .बोरकर ह्या एक जेष्ठ सहकारी , गोव्यातल्या एका कुटुंबातली गृहिणी पण आशा ताई च्या बरोबर काम करता करता ह्या शान्तेची दुर्गा कधी झाली ते कळलेही नाही ,आशाताई च्या बरोबर शुभा ताई हि तेवढ्याच तोलामोलाचे काम करताहेत आणि आणि महालक्ष्मी स्तोत्राप्रमाणे पुण्यादाई ठरणारी आशा,शुभा हि नामावली अशीच मांडवी जुवारी सारखी अव्याहत वाहत राहील .गोमान्ताकातले जेष्ठांचे जीवन फुलवत राहील
.
मला समाजाने काय दिले ह्या पेक्षा मी समाजाला काय देऊ शकतो ह्याचा सतत ध्यास धरून समाज कार्य करणाऱ्या सम विचारी कार्यकर्त्यांची सेना आशा ताई नि उभारली आहे ,आणि त्या सेनेचा प्रत्येक सैनिकही सेनापतीचे कर्तव्य लीलया पार पडू शकेल एवढे मनोबल निर्माण करण्याची किमया त्यांना प्राप्त झाली आहे
.
संस्था फक्त भावनेवर चालत नाही शिस्त आणि आर्थिक बळ ह्या दोन्ही पायावर त्या चालतात आणि वाढतात, ,सेवा वृत्ती तळागाळा पर्यंत पोहचली आहे. माणुसकीचा चेहरा घेऊन आलेली शिस्त हे संजीवनाचे ध्येय आहे .  नात्यांची छपरे उडताना गोमंतकीय वृद्धांसाठी संजीवन ठामपणे उभे आहे ,महिलांसाठी मायेची उब देणारे माहेर ,आणि पुरुषांसाठी "अजूनही तुमची उपयुक्तता संपली नाही असे ठाम पणे सांगणारे आपले घर
.
मदर तेरेसा ,सिंधुताई सकपाळ,ह्यांच्या तोडीचे काम संजीवन करते आहे ,आणि तेही ज्येष्ठांना ताठ मानेने उभे करत , वानप्रस्थ आश्रमाचे महत्व पटवत वाट चाल करते आहे , आज समाजाला अशा आरोग्याधामांची आवश्यकता आहे ,.तिथे समवयस्क आपल्या समस्यांचा मोकळे पणाने विचार करू शकतात आणि त्या मुळेच दोन पिढीत पसरणारी कटुता दूर होऊ शकते सामंजस्याची घट्ट वीण बांधली जाऊ शकते ,आणि समाज एक संध राहू शकतो ,शेवटचा दिस गोड व्हावा हि संकल्पना सत्यात उतरण्याची शाश्वती संजीवन देतो आहे
.
आशा शुभा आणि अश्या अनेकजणी चंदनासारख्या झिजत आहेत ,त्यांचा गोमंतकीय समाजच नव्हे तर हि भारत भूमी ऋणी आहे.माझे म्हातारपण कसे असेल ह्या भयावह प्रश्नाला संजीवन चे उत्तर आहे.


                                   योग- क्षेमं ­वहाम्यहम.”
 संजीवन डोंगर माथ्यावर आहे आणि आशाताई तिथेच असतात ,त्यांच्या आठवणीने एक समर्थ उक्ती सहजच ओठावर येतात "आशा डोंगरी राहते योग क्षेम जेष्ठांचा वाहते "आशा शुभा आणि अशाच अनेक दैदिप्यमान मातृकांना माझे कोटी कोटी प्रणाम.
          शशांक रांगणेकर

              मुंबई
               
९८२१४५८६०२