Wednesday, May 16, 2012

दिनेश पवार


दिनेश पवार
जीवन जगायची धारणा जो देतो तो धर्म,धर्माची हि व्याख्या सांगणारा एक धार्मिक मला फेस बुक वर सापडला ,आपल्या मनोगतात धर्म आणि त्या बद्दल आपले सुस्पष्ट विचार शब्दांकित करणारा एक युवक ,पशु पक्ष्यांवर मनापासून प्रेम करणारा एक पक्षीप्रेमी,
धर्म आणि जाती ह्यांच्यावर आधारित समाजकारण आणि राजकारण महाराष्ट्र भूमीत कधीच रुजले नाही
महाराष्ट्र भूमीचा धर्म सर्व जाती पंथ ह्यांना एकत्र ठेवणारा धर्म होता आणि आहे ,ज्ञानेश्वर ,तुकाराम नामदेव सावतामाळी ह्यांनी रुजवलेला वाढवलेला धर्म आहे. त्या धर्माचे नाव मानवता.मराठी साहित्यालाही धर्माचे वावडे नाही ,मुस्लीम धर्मीय संत कवी ,मराठीतले ख्रिस्त पुराण हि हि  मराठीची लाडकी अपत्ये.
शिवाजी हा महाराष्ट्राचा राजा होता ,महाराष्ट्रातल्या मुस्लीम बंधावानाही तो तितकाच प्रिय होता आणि आहे कारण शिवरायाच्या राजकारणाला जातीय अथवा धर्मांध राजकारणाचा रंग नव्हता त्याचा रंग भगवा होता एक शुचितेचा रंग ,विरक्तीचा रंग ,राजा हा जगाचा उपभोग शून्य स्वामी असतो ह्या तत्वांवर नितांत विश्वास असणारा राजा होता सर्व प्रजा हि समान लेकारासारखी असे समजणारा एक कुटुंब प्रमुख ,हा आपला तो परका अशी वृत्ती राजांच्या ठाई
नव्हती .जाती आणि धर्मापासून दूर राहणारे आणि सर्वांनाच सामावून घेणारे त्यांचे राजकारण होते ,म्हणूनच तत्कालीन समाजात सर्व जाती धर्मात शिवाजी राजे आमचा शिवाजी म्हणून लोकप्रिय होते मानवता ह्या एकाच तत्वावर शिवरायाचे राजकारण आधारित होते आणि त्यामुळेच त्यांची लोकप्रियता आजही सर्व धर्मीय जनमानसात टिकून आहे. धर्मांधतेची विषवल्ली ह्या मातीत कधीही रुजली नाही आणि रुजणार हि नाही.
इतिहासाची पुनरावृत्ती होते ,शाहीर अमर शेख ह्यांच्या सुकन्या सुश्री प्रेरणा अमरशेख ह्या आमच्या पार्ले महाविद्यालयात शिकत होत्या , फॉर्म भरताना जात आणि धर्म ह्या सदराखाली घातलेला "मानवता"हा शब्द बदलण्यास त्यांनी नकार दिला होता. गीता रहस्य लिहिणारे बाल गंगाधर टिळक तेल्या ताम्बोल्यांचे पुढारी म्हणून "लोकमान्य "होते .मानवतेचा मळवट भरलेले राजकारण आणि समाजकारण हीच मराठी माणसाची खरी ओळख .आणि आनंदाची गोष्ट म्हणजे एक मराठी युवक जो फार तर २४ /२५ वर्षाचा असेल तो ह्या तत्वज्ञानाचे समर्थन करतो आहे. दिनेश तुझ्या सारख्या तरुणांच्या हातातच महाराष्ट्राचे भविष्य सुरक्षित आहे मी दिनेश पवार ह्या व्यक्तीला व्यक्तीशः ओळखत नाही पण माझ्या ओळीखिचा आहे त्याचा मानव धर्म ,पशु पक्ष्यांवरचे त्याचे प्रेम ,उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी घराबाहेर पाणी ठेवा म्हणून मनाला भिजवणारी हाक,आणि केवळ मनुष्य जातीवर नव्हे तर तुमच्या बरोबर ह्या वसुंधरेवर सह प्रवासी म्हणून आलेल्या सर्व सजीवांवर प्रेम करा आणि त्यांचाही जगण्याचा हक्क मान्य करा म्हणून केलेली एक कळकळीची विनंती.
दिनेश हे सूर्याचे नाव आहे अंधार संपतो प्रकाशाचे राज्य चालू होते समाजाच्या ,मनातला अंधार संपायला मानवतेचे प्रकाश किरण उगवावे लागतात ,आपल्या नावाला साजेसे काम करणाऱ्या दिनेश पवारला मैत्रायानाच्या हार्दिक शुभेच्छा
शशांक रांगणेकर