Friday, November 7, 2014

सारंग भणगे

. सारंग भणगे
अखेर लिहाचे कशा साठी तर ह्या हृदयीचे त्या हृदयी जाण्यासाठी ,लेखकाचे कवीचे विचार जेव्हा शब्दांच्या माध्यमातून वाचकाकडे पोहचतात  रुजतात आणि नव  निर्मिती होते. त्यासाठी त्या शब्दात रुजण्याची एक क्षमता असावी लागते ,अथवा बुद्बुद्यान्सारखे उमटणारे शब्द कवी आणि कवितेला घेऊन बुडतात आणि त्यांचा मागमूसही राहत नाही सारंग 
भणगे एक तरुण कवी ,लेखक ,विचारवंत असे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. ज्याच्या लेखनात  केवळ शब्दांची  आतिषबाजी नसून भावनांची पखरण  जागोजाग आढळते ,
अखेर शब्द म्हणजे काय केवळ स्वर आणि व्यंजनांचे वंध्या मैथुन नव्हे तर भावोनोत्सावांचे एक संस्करण आणि निर्मितीचा कुमारसंभव सागरचे लेखन हा निर्मितीचा एक सोहळाच आसतो ,त्याच्या मनातल्या भावनांना वाचकाच्या मनात उतरवून  त्यात संवेदनाची प्राण प्रतिष्ठा करणारी त्याची कविता हि आगळी वेगळीच .
त्याच्या दोन कविता वाचण्याचे सौभाग्य नुकतेच मला प्राप्त झाले ,"पांडुरंग रावो" आणि नमन
पंढरपूरचा कटेवरी कर ठेऊन उभा ठाकलेला   कानडा विठ्ठलू हे मराठी मनाचे प्राण ज्याला विठोबा माहित नाही तो मराठी नाही ,
संत वांग्मय  हि तर मराठी साहित्याची सद्सद्विवेक बुद्धीच संतानी मराठी साहित्याला दिशा दिली ,चांगले आणि वाईट ह्यातला फरक सांगितला आणि ईश्वर प्राप्तीचा मार्ग मानवी सेवेतून जातो हे दाखवले  नाम संकीर्तनातून ईश्वर  प्राप्तीचे गुज दाखवले आणि देवाला मानवी चेहरा आणि माणसाला देवत्वाची झळाळी दिली ,भक्ती मार्गातून मोक्ष प्राप्तीचे मार्ग दाखवले हीच संत परंपरा सागरच्या ह्या कवितेत दिसूनय़ेते ,संत हि प्रवृत्ती आहे नावाची लेबले फक्त आपल्या सोयीसाठी लावायची मग ते नाव तुकाराम असो अथवा सागर असो 
भाव तेच आणि सत्प्र्वृत्तीही तीच सर्व मोहातून बाहेर पडण्याची" विसरला लोभ, विसरला मोह
आनंदाचा डोह, पांडुरंग

पाहिले डोळिया, पांडुरंग रावो
आता नेत्र जाओ, मिटूनिया"  इच्छिणारी
 
संत हे कालातीत असतात कारण ती एक प्रवृत्ती आहे ती ज्याच्या मनात प्रगटते आणी लेखनात विचारात उमटते तो संत मग तुकोबान सारखा देशी वेषातला आसो कि सागर सारखा अद्यावत असो सत्प्रवृत्ती एकाच आणी त्यांचे गण गोत हि एकच . 
 
 नमन हि त्याची आणि एक कविता ,   ज्ञानाच्या  तेजो रूपाने भारावलेला कवी नमन मधून नुसता दिसताच नाही तर प्रगटतो" चिर अमरचि होतो ज्ञान ज्याला मिळे तो
परम अढळ स्थानी फक्त ज्ञानीच जातो"म्हणत ज्ञानाची महती गातो उपमा  आणी अलंकारांनी सजलेली हि सागराची कविता पंडीत कवी कालीन काव्याची आठवण करून देते 

अविरत रत अभ्यासात मेधा जयाची
दवडत क्षण नाही शारदा फक्त त्याची


ढग जल भरलेले ज्ञानवंताप्रमाणे
उचितचि उपमा ही ज्ञान पाण्याप्रमाणे
हि दोन कडवी यमक्या वामनाची आठवण ताजी करते ,
सारंगच्या  ह्या दोन कविता त्याच्या संत आणी पंडीत काव्याच्या संस्काराचे आगळे वेगळे रूप आहे ते इथेच संपत नाही ,श्रीकृष्णाच्या बालरूपाने आपल्या उघडलेल्या मुखात ब्रम्हांडाचे दर्शन यशोदेला करवले ,सागराच्या कवितेत सारंग  करवतो ,
सारंग  जे  लिहितो ते विसरता येत नाही ,त्याची आठवण मनातून जात नाही ,
शब्दशाह सारंगला   मैत्राय़ाणा चे  शब्दशः सलाम . शशांक रांगणेकर 
मुंबई 
९८२१४५८६०२

Wednesday, October 8, 2014

निशब्द देव

निशब्द देव मराठी कवितेला पडलेले एक भाव गर्भ स्वप्न,मनात आलेल्या भावनांना शब्दांचे रंगरूप देऊन रसिकांच्या मनापर्यंत पोहचविण्याचे काम हे कवीचे काम ,आणि निशब्द हा शत प्रती शत कवी आहे. अतिशय थोडक्या शब्दात जास्तीत जास्त भाव व्यक्त करणे हे उत्तम कवितेचे आदिस्वरूप.निशब्द ह्या कलेत पारंगत आहे.
जीवन चढ उतारांच्या सापशिडी च्या पटावरमुद्रांकित केलेले असते.सुख दुक्ख ,आहेरे नाहीरे ,उन्हा पाउस,जन्म मृत्यू ,अश्या अनेक उलट अर्थी शब्दांची ओळख होताच जाते ,त्यातून पाझरणारे भाव शब्दांच्या जवळपास पोहचतात पण कधीकधी ह्या दोन टोकांच्या मध्ये होणारी घुसमट मात्र निशब्द असते ,आणि देव त्या घुसमटीला अचूक शब्दांच्या पकडीत पकडतात आणि वाचका पर्यंत पोहचवतात ,जळणाऱ्या ज्वालेला शब्दात रंगवता येते पण धुमसणाऱ्या घुसमटीला शब्दांचा टाहो फोडणे फार कठीण आणि देवाच्या कवितेत नेमके तेच सामर्थ्य आहे ,निश्श्ब्द असूनही अतिशय बोलकी अशी हि देवांची बोलकी कविता केशवसुतांच्या "झपूर्झा गडे झपूर्झा"ह्या कवितेशी जवळीक साधणारी वाटते.
आभाळा एवढे दुक्ख दोन ओळीच्या कवितेत मांडण्याचे आणि त्यायोगे अनुचित राजकारणावर दोनच ओळीचे काव्य आसुडा प्रमाणे ओढणारी
त्यांची कविता जेव्हा "चांगले गुण होते पण जातीने गोंधळ केला म्हणते "तेव्हा मंडलआयोग आणि त्यानंतरचे अजूनही धुमसणारे जळीत उभे राहते.
देवांची कविता हि सर्वगामी आहे ,व्यक्ती पासून समष्टी पर्यंत पोहचणारी ,दुक्खाचे पापुद्रेन पापुद्रे सैल करणारी आणि आणि सुखकर तुझा प्रवास विठ्ठला म्हणत आध्यात्य्म्याच्या अबोल मुक्तीला स्पर्श करणारी कविता.
देवांची कविता काम क्रोध मद मोह मत्सर ह्या सर्व मानवी गुण अवगुणाचे चित्रणही फार छान करते.कारण कल्पनेचे पंख लाऊन फिरणाऱ्या ह्या कवीचे पाय मात्र वास्तवाच्या मातीत घट्ट रोवलेले आहेत.
देवांची कविता आणि तिचा अर्थ म्हणजे सतत वाहत जाणाऱ्या आणि पात्र बदलणाऱ्या नदीचे चित्रण शब्दात न पकडता येण्या जोगे ,शब्दांच्या कवेत दुक्खला कवलानारी आणि अर्थाच्या रंगात सुखाला रंगवणारी.देवांची कविता ,निशब्द देवाची बोलाकेच नव्हे तर अबोल करणारी हि कविता एकून म्हणावसे वाटते "देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो."सूर्य किरणासारखी स्वच्छ आणि लखलखीत पसरणारी आणि आभाळ माये सारखी बरसणारी देवांची कविता आणि निशब्द देव ह्यांना मैत्रायानाचे सलाम .
शशांक रांगणेकर
मुंबई
९८२१४५८६०२

Wednesday, October 1, 2014

श्रेयस गोखले

श्रेयस गोखले
"का कशाला?कोणासाठी ?हे  आयुष्य जगायचे असते हा प्रश्न आहे एका चोवीस वर्षीय तरुणाचा ज्या वयात पाय जमिनीला लागत नाहीत त्या वयात का कशासाठी आणी कोणासाठी जगायचे हा प्रश्न ज्याला पडतो तोच जगण्याचे मोल जाणतो आणी त्यला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरेही सोडवतो हा माझा अनुभव आहे आणी ज्याला हे प्रश्न पडत नाही त्याला उत्तरेही सापडत नाही हाही एक अनुभव
 श्रेयस तरुण आहे ,आणी नुसताच तरुण नाही तर तारुण्य त्याच्या रगारगात सळसळते आहे ,फक्त गल्लीच्या नाक्यावर ,कॉलेज च्या क्यान्तीन मध्ये ओघळणारे हे तारुण्य नव्हे तर मला काहीतरी करायचे आहे कुच  करके दिखाना है म्हणत कोका कोल्याची जाहिरात करणारे हे वांझोटे तारुण्य नव्हे तर आस्मांको  जमिन् से  मिलाना है सांगणारे सर्जनशील तारुण्य आहे ,सर्जनशीलता हि जर तरुणाईला साथ करत नसेल तर ती तरुणाई वांझोटी ठरते आणी फक्त लोक संख्येची पूज्ये वाढवते .,पण सर्जनशीलतेचे कोंब फुटणारे काव्य करणारा एखादाच श्रेयस आयुष्याला जीवन म्हणावेसे वाटणारी वाटचाल करतो आणी ती हि चोविशीच्या उण्यापुऱ्या शिदोरीच्या जोरावर काय समजायचे लखलखीत काव्य प्रेरणा कि गत जन्माची क्यारी फॉर वर्ड  होणारी दैवी देणगी .अगम्य आणी  अतर्क्य
श्रेयस नागपूरचा आहे अगदी संत्र्यासारखा रसरशीत आणी रसाळ ,काहीच दिवसापूर्वी उर्जा नावाचा एक हवाबंद पाण्याचा प्रकार बाजारात आला आहे कदाचित श्रेयसचे ब्रांदिंग सुरु झालेले दिसतेय .
श्रेयस चे व्यक्तिमत्व अष्टपैलू आहे तो लिहितो ,कविता करतो ,चित्रपट कथा लिहितो अभिनय करतो दिग्दर्शन करतो आणी लघुका होईना चित्रपटाची निर्मितीही करतो थोडक्यात सांगायचे झाले तर निर्मितीचे कोणतेही क्षेत्र त्याच्या सुगंधी स्पर्शा  पासुन अस्पर्श राहिलेले नाही . एखादे संध्याकाळी श्रावणी पावसात खुलणाऱ्या इंद्रधनुष्या सारखे व्यक्तिमत्व सगळेच रंग तेवढेच लोभस आणी मोहक
श्रेयस लघु पट निर्मिती करतो आहे ,श्रेयस च्या व्यक्तीमत्वाची सर्व बिरूद मिरवणारी हि निर्मिती आपल्या सगळ्यांच्या पसंतीस पुरेपूर उतरेल ह्या बद्दल शंकाच नाही ।
श्रेयसचे हे द्वैदिप्यमान स्वयम्प्रकाशीत व्यक्तिमत्व पाहतानाच ओठांवर नकळत ओळी येतात "गगनी उगवला सायंतारा "
श्रेयसच्या क्यालीडोस्कोपिक व्यक्तिमत्वाला  मैत्रायानाच्या असंख्य शुभेच्छा
शशांक रांगणेकर
मुंबई
९८२१४५८६०२


 
 

"मैत्रायण"
प्रिय जनहो
आयुष्यात चांगली माणसे भेटणे हा दैव(देव)योगच म्हणायचा,त्या देव योगाने आयुष्य संपन्न होत आलाय,"अंनंत हस्ते कमलाकराने ,देता किती घेशील दो कराने"हे नक्षत्रंचे देणे सांभाळून तरी कसे ठेवायचे आणि कुठे ,अमृतात पैजा जिंके अश्या माय बोलीचाच आसरा ,,मला भेटलेल्या ह्या सर्वसामान्य वाटणाऱ्या पण असमान्यात्वाची अदृश्य कवच कुंडले धारण करणाऱ्या ह्या मित्रांची मी रेखाटलेली वेडी वाकडी काहोईना चित्रे
तुमच्या पुढे सादर करण्याची मनोमन इच्छा ,साधन "मैत्रायण ""अपुरी शब्दसंपत्ती आणि अपुऱ्या प्रतिभेचा वारसा घेऊन येणाऱ्या ह्या संकल्पनेला फक्त तुमच्याच प्रेमाचा बुडत्याला काडी सारखा वाटणारा आधार ,तुमचा वाचनीय पाठींबा सदैव असो द्यावा .जिथे पु.ल.सारखी दैवत जन्माला येतात तिथल्या मातीलाही फुलांचा वास येतो हेच खरे,मग ते कोर्हन्तीचा का असेना ,मी अभिमानाने सांगतो कि मी पार्ल्याचा आहे ज्या पार्ल्याचे नाव पु ल.नि अजरामर केले ,माणसांनी माणसाचे देव गुण वर्णावे हा त्यांनी दिलेला वारसा ,त्याची जपणूक करण्याची केलेली एक केविलवाणी का होईना धडपड ,,"मैत्रायण"
शशांक रांगणेकर

Thursday, October 3, 2013

शशांक शिरीष केतकर

काही फुले स्वतःचा वेगळा गंधच नव्हे तर गुणविशेष हि घेऊन येतात ,सुर्याबरोबर उगवणारे आणि मावळ णारे 
सूर्य फुल ,रात्रीच घमघमणारी रातराणी ,मादक सुगंधाची उधळ ण करणारा सोनचाफा आणि प्रसन्न हसऱ्या चेहऱ्याचा पारिजात,मिश्कल भावांचे बागडे रूप मिरवणारा झेंडू आणि वसंताची चाहूल सांगणारा आंब्याचा मोहर.,प्रत्येक फुलाचे रूपही आगळे आणि गंधही वेगळा.

मला वाटते प्रत्येक माणसाच्या व्यक्तीमत्वात एक फुल दडलेले असते.म्हणून तापट प्रवृत्तीचा माणूस गुलमोहराची आठवण करून देतो .आणि शांत आणि सोज्वळ प्रवृत्तीचा माणूस ब्रम्हकमळ भासतो.झी च्या पडद्यावर एका ब्रम्ह कमळाचे दर्शन झाले एका मालिकेच्या योगाने  मालिकेचे नाव आहे, "होणार सून मी त्या घरची."
झी ने प्रस्तुत केलेली आणि एक मालिका .वास्तव आणि कल्पना रम्यतेचे बेलामुम मिश्रण दाखवणारी
आणि एक मालिका ,त्यात उल्लेख करण्या सारखे आहे ती काय ?    
ह्या मालिकेत एका ब्रम्ह कमळाचे विलोभनीय दर्शन होतेय.आणि त्याचे नाव आहे "शशांक शिरीष केतकर "त्याचे वर्णन करायचे झाले तर एकाच वाक्यात करता येईल कि "तो आला त्याने पहिले आणि जिंकले .
ब्रम्हकमळ उगवते तेच बुद्धिमत्ता आणि प्रासादिक सोज्वळतेचे तोरण लाऊनच .त्याच्या चेहऱ्यावरच्या सोज्वळ अस्तित्वानेच हि मालिका तरली आणि तारली आहे असे म्हंटले तर वावगे ठरू नये.त्याच्या शिवाय ह्या मालिकेचा विचार करणे दुस्साहस ठरेल एवढी त्यांनी मालिका व्यापली आहे.त्याच्या चेहऱ्यावर फुलणारे सात्विक भाव हा केवळ अभिनय नसून शुद्ध बावनकशी सोने आहे  ह्या सुवर्ण योगाची प्रचीती क्षणा क्षणाला  येते.अभिनेत्याच्या  अंतरंगातले अष्टभाव सांगणारी हि मालिका त्याचा एकपात्री प्रयोग वाटावा इतकी प्रथमपुरुषी एकवचनी वाटते . शशांक चे रूप आणि त्याही पेक्षा स्वरूप  जास्त  भावते.कुठेतरी वाटते की मस्तकातली बुद्धी मत्ता आणि हृदयातली माणुसकी ह्याचा अभूत पूर्व संगम त्याच्या स्वरुपात दिसतो.
अभिनय कला  हि दैवी देणगी आहे पण प्रासादिक आणि सोज्वळ भावनांचे प्रगटीकरण करणारी अभिनय कला हि पूर्वपुण्याईने मिळालेली देणगी आहे. माणसाच्या आयुष्यात त्याच्यावर होणारे संस्कार हे फार महत्वाचे असतात ,शशांकाचे सुगंधी अस्तित्व आणि प्रसन्न व्यक्तिमत्व हि त्याच्या वर झालेल्या संस्कारांची बोलती चालती प्रचीती आहे.
शशांक ज्या रुपात दिसतो त्या रुपात कुठेतरी श्रीकृष्ण ,कुठेतरी,विवेकानंद हि दिसतात शशांकने ह्या विषयावर बेतलेल्या मालिकेत जरूर काम कराव.त्याच्या इतका न्याय ह्या भूमिकेन कदाचित दुसरा कोणताही अभिनेता देऊ शकणार नाही.
शशांकचे कौतुक हि मनातली हाक आहे ,मराठी मलिकाच्या माध्यमातून हरवलेली सोज्वळ सुसंकृत मराठी प्रतिभा कुठेतरी हळुवारपणे फुलते आहे,ह्याची जाण माझ्या प्रमाणे केवळ शशांकची कलाकृती आहे म्हणून बघणाऱ्या असंख्य दर्शकांची आवड आहे.
शशांकाचे  रूप हे ब्रम्हकमलिय स्वरूप आहे प्रासादिक सोज्वळ तेचे  लेणे लेऊन आलेले एक व्यक्तिमत्व पाहताच शब्द ओठावर येतात "रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी "


शशांकच्या ह्याब्रम्हकमलि  स्वरूपाला
 अनेक शुभाशीर्वाद.

Tuesday, May 14, 2013

“मक्या आकाशा एवढा

मक्या आकाशा एवढा"

मकरंद केतकर, माझा एक मैत्र. मित्र म्हणून संबोधता मैत्र म्हणून  संबोधावे इतके आयुष्याच्या सर्व रेखांश अक्षांशांना  नुसतेच स्पर्शित करता सुगंधित करणारे व्यक्तिमत्व. मक्या ठाण्याचा. फेसबुक वर त्याची आणि माझी ओळख झाली. मक्याला भेटायला मी ठाण्याला गेलो. दुपारी दोन वाजता हा भरत मिलापाचा चांदण्यातला प्रयोग ठाणे शहराच्या द्रुतगती मार्गावर संपन्न झाला. मक्या भेटला आणि वाटले पुंडलिका भेटी परब्रम्ह आले. प्रकृती बरी नसल्याने चेहरा थोडासा कोमेजला होता पण बुद्धिमत्तेची चमक मात्र लखलखीत आणि शाबूत दिसत होती. साक्षेपी बुद्धिमत्तेचा एक निरहंकारी अविष्कार साक्षात माझ्यासमोर उभा होता.

त्या दिवसापासून मैत्रीचा वेलू गगनांतरी पोहचला आहे. माझ्यापेक्षा कमीत कमी तीन दशकानंतर जन्माला आलेला हा तरुण माझा मैत्राची भूमिका बजावतो आहे.आणि तेही कोणताही वाणिज्य भाव ठेवता. मी ह्याला मित्र म्हणता मैत्र म्हणतो कारण त्या शब्दाला केवळ एकच अर्थ अभिप्रेत नाही तर गाईड फिलॉसॉफर हे दोन पदरही अभिप्रेत आहेत आणि ती भूमिका तो चोखपणे पार  पाडतो आहे. वयातले अंतर पार करून आमची मैत्री अगदी कृष्णार्जुनाच्या पातळीवर पोहोचली आहे. फरक एवढाच की श्रीकृष्ण पंचविशीत आहे तर पार्थाची साठी ओलांडून दोन वर्षे झाली आहेत. एवढे वयाचे अंतर पार  करूनही दोघेही थकलेले नाहीत. पार्थ उवाच आणि  श्रीकृष्ण उवाच हा गीता पाठ सतत चालू असतो.

बुद्धिवाद हे मक्याच्या स्वभावाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. समर्थ रामदासांचा हा भक्त त्यांनी सांगितलेले 'मनाचे श्लोक फक्त कंठ्स्त करत नाही तर आचरणात हि आणतो. समर्थांच्या विचारधारेवर मनापासून प्रेम करणारा समर्थ भक्त  त्यांच्या विचारधारेवर आपला बुद्धिवाद घासून लखलखित करत असतो. 'बुद्धिवादी असणे म्हणजे माणुसकीशी फारकत घेणे' असा एक लाडका गैरसमज आपल्याकडे प्रचलित आहे. पण मक्याचा बुद्धिवाद मात्र नेहमीच माणुसकीचा तोंडावळा घेऊनच येतो. अगदी "मऊ मेणाहुनी विष्णुदास आम्ही" इतका सदय आणि तसाच वेळ प्रसंगी "नाठाळाच्या  माथी काठी हाणणारा."

मराठी माणसावर आणि भाषेवर मनापासून प्रेम करणारा हा शतप्रतिशत मराठी माणूस महाराष्ट्राच्या दैवतावर शिवरायांवर आणि त्यांच्या गड किल्ल्यांवरही पु लंच्या हरितात्यांसारखे प्रेम करतो. आपल्या 'दुर्गसखा' संस्थेचे अनेक कार्यक्रम आयोजित करून आपल्या मराठी इतिहासाच्या अनेक रमल खुणा  तरुणाईच्या समोर आणतो.

मक्या 'मित्राळू' माणूस आहे, प्रेमळ आहे, त्याचे मित्र त्याच्यासाठी सर्वस्व आहेत. अनेक सद्गुणांची अंगभूत बिरुदे बाळगणारा हा माझा मित्र मला लाभला हे माझे भाग्यच.

आणि मित्राच्या बाबतीत हा सदैव "त्वमेव माता पिता त्वमेव | त्वमेव बंधू सखा त्वमेव |" ह्या भूमिकेतच वावरत असतो. ह्याच्या स्वतःच्या लग्नात अर्धे लक्ष आपल्या होणार्या अर्धांगाकडे होते तर अर्धे लक्ष मित्रांकडे होते. आयुष्यात सर्वच नाती तेवढीच प्रिय आणि महत्वपूर्ण असतात. त्यात डावे उजवे करता येत नाही ह्याचे उदाहरण .

संघटन कुशलता हा एक अंगभूत गुण विशेष  असतो. अनेक विचारांच्या प्रवृत्तीच्या लोकांना एकत्र आणून  त्यांच्याकडून लोकोपयोगी कामे करून घेणे हे अतिशय कठीण काम. मक्याच्या दुर्गासखा संस्थेने हे दुष्कर काम करून दाखवले आहे. आदिवासी इलाख्यात जाऊन हि संस्था काम करते अर्थात मक्याबरोबर असे अनेक तरुण ह्या कामासाठी राबताहेत आणि त्या संस्थेला मिळत आहेत. "दिसामाजी काहीतरी वाचीत जावे" ह्या 'समर्थोक्ती'वर मक्या पूर्णपणे विश्वासून आहे. त्याचा वाचनाचा व्यासंग फार  मोठा आहे. वाचनाच्या ह्या व्यासंगाने मक्याला बहुश्रुत घडवले आहे आणि सदयही.

गुणविशेष तर सढळ हाताने दिले आहेत तसेच मोठे मनही. त्याच्या स्नेहाच्या आभाळ मायेचे पांघरूण आयुष्यभर पुरेल अशी उब देते. करायचीच झाली तर एकाच तक्रार देवाजवळ करावीशी वाटते कि आयुष्याच्या संध्याकाळीच का हा वळवाचा पाऊस पाडतो आहेस. शेवटचे दिस गोड व्हावे म्हणून का?
मक्यासारखा मित्र पुढील जन्मीही मिळणार असेल तर देवाकडे आळवावेसे वाटते कि "तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी

शशांक  रांगणेकर 

Thursday, December 27, 2012

“आशा डोंगरी राहते योग क्षेम जेष्ठांचा वाहते






“आशा डोंगरी राहते योग क्षेम जेष्ठांचा वाहते..
भारतीय संस्कृतीने स्त्रीच्या मातृ रुपाला आदराच्या अत्त्युच्य पदावर विराजित केले.आहे . आणि भारतीय नारींनी त्या आदराला पात्र असल्याची प्रचीती वेळोवेळी दिली आहे.अशाच एका मातृ रूपाचे पुण्यप्रद दर्शन नुकतेच झाले .आशाताई सावर्डेकर आणि त्यांचे "संजीवन आरोग्य धाम "गोमंतक भूमितले मातृ भावाचे एक लीळा चरित्र.
जग वेगाने चालले आहे ,आणि गोमंतक हि ह्या जगाचा भाग असल्याने त्या वेगाने होणारी पड झड इथेही पोहोचली आहे. त्या वेगाचा पहिला दृश्य प्रत्याघात म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीची होणारी वाताहात.खर म्हणाल तर इथे पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा हेच खरे .ज्यांचा वृद्धत्वाने शारीरिक वेग मंदावला आहे त्यांना चार भिंतीच्या आड कुढतच राहावे लागते ,सर्व काही असूनही वंचित राहावे लागते आणि आपण ओझे होतोय अशी एक जाळणारी जाणीव मनात घर करायला लागते ,आणि खरे म्हातारपण इथून जाणवायला लागते .ह्यात कोणाचाच दोष नसतो ,इच्छा असूनही तरुण मुले वृद्धांबरोबर वेळ घालवू शकत नाही कारण जीवघेण्या स्पर्धेच्या जगात ती हि भरडली जाताहेत , वाढत्या महागाई मुळे सगळ्याच जणांना अर्थार्जन करावे लागते आहे जेष्ठांकडे लक्ष द्यायला इच्छा असूनही तरुण मंडळी वेळ देऊ शकत नाहीत, चार भिंतींच्या आड घर खायला उठते ,आणि मग वाटू लागते कि दीर्घायुष्य हा शाप आहे.शतायुषी भव हा आशीर्वाद नाही आणि तसे सांगणारी उपनिषदे हि फोल आहेत. समाज जीवनात जेव्हा अशी वादळे  घोंघावतात तेव्हाच संत प्रवृत्ती जागृत होते .संत काही वेगळे नसतात ते सर्व सामान्य माणसांसारखेच असतात फक्त त्यांच्यात जागृत होतो सत प्रवृत्तीचा साक्षात्कार ,आणि असे संत भारत भूमीत अनेक आहेत आणि अव्याहत निर्माण होणार आहेत
.
तुकोबांचे एक वचन आहे " जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले ....... देव तेथेचि जाणावा , हि जाण घेऊन आशा ताई नि आपले संजीवन आरोघ्याधाम सुरु केले 'आणि आज त्याचा वेलू गगनंतरी गेला आहे
.
आशा सावर्डेकर एक सुशिक्षित गोमंतकीय कन्या ,तिचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबापुरीत झाले पण आपली कर्म भूमी गोयच्या मातीतच आहे त्यांनी पक्के ठरवले होते .माणसे घडवावी लागतात ,माणुसकीचा ओजस्वी मंत्र त्यांच्या मनात फुंकावा लागतो हि आशाताईंची धारणा .जो जगण्याची धारणा देतो तो धर्म आणि ह्या धर्मावर आशा ताई पूर्ण श्रद्धा ठेवतात
.
आशा ताई चे दिवंगत पती सैन्यात होते ,त्यांच्या बरोबरच्या सहजीवानाने केवळ दोन कन्यकांची नव्हे तर एका विजगेषु वृत्तीचीही प्राप्ती झाली. सैन्यात एकसंधता आली तर प्रत्येक सैनिक सेनापती सारखा वागतो हा त्यांना त्या सहजीवनातून मिळालेला एक मौलिक संदेश.आशा ताई ह्या संघ भावनेला मनापासून जपतात आणि जोपासतात हि , आणि त्यामुळेच त्यांच्या सहकारी त्यांच्या खांद्याला खांदा लाऊन काम करताहेत
.
श्रीमती .बोरकर ह्या एक जेष्ठ सहकारी , गोव्यातल्या एका कुटुंबातली गृहिणी पण आशा ताई च्या बरोबर काम करता करता ह्या शान्तेची दुर्गा कधी झाली ते कळलेही नाही ,आशाताई च्या बरोबर शुभा ताई हि तेवढ्याच तोलामोलाचे काम करताहेत आणि आणि महालक्ष्मी स्तोत्राप्रमाणे पुण्यादाई ठरणारी आशा,शुभा हि नामावली अशीच मांडवी जुवारी सारखी अव्याहत वाहत राहील .गोमान्ताकातले जेष्ठांचे जीवन फुलवत राहील
.
मला समाजाने काय दिले ह्या पेक्षा मी समाजाला काय देऊ शकतो ह्याचा सतत ध्यास धरून समाज कार्य करणाऱ्या सम विचारी कार्यकर्त्यांची सेना आशा ताई नि उभारली आहे ,आणि त्या सेनेचा प्रत्येक सैनिकही सेनापतीचे कर्तव्य लीलया पार पडू शकेल एवढे मनोबल निर्माण करण्याची किमया त्यांना प्राप्त झाली आहे
.
संस्था फक्त भावनेवर चालत नाही शिस्त आणि आर्थिक बळ ह्या दोन्ही पायावर त्या चालतात आणि वाढतात, ,सेवा वृत्ती तळागाळा पर्यंत पोहचली आहे. माणुसकीचा चेहरा घेऊन आलेली शिस्त हे संजीवनाचे ध्येय आहे .  नात्यांची छपरे उडताना गोमंतकीय वृद्धांसाठी संजीवन ठामपणे उभे आहे ,महिलांसाठी मायेची उब देणारे माहेर ,आणि पुरुषांसाठी "अजूनही तुमची उपयुक्तता संपली नाही असे ठाम पणे सांगणारे आपले घर
.
मदर तेरेसा ,सिंधुताई सकपाळ,ह्यांच्या तोडीचे काम संजीवन करते आहे ,आणि तेही ज्येष्ठांना ताठ मानेने उभे करत , वानप्रस्थ आश्रमाचे महत्व पटवत वाट चाल करते आहे , आज समाजाला अशा आरोग्याधामांची आवश्यकता आहे ,.तिथे समवयस्क आपल्या समस्यांचा मोकळे पणाने विचार करू शकतात आणि त्या मुळेच दोन पिढीत पसरणारी कटुता दूर होऊ शकते सामंजस्याची घट्ट वीण बांधली जाऊ शकते ,आणि समाज एक संध राहू शकतो ,शेवटचा दिस गोड व्हावा हि संकल्पना सत्यात उतरण्याची शाश्वती संजीवन देतो आहे
.
आशा शुभा आणि अश्या अनेकजणी चंदनासारख्या झिजत आहेत ,त्यांचा गोमंतकीय समाजच नव्हे तर हि भारत भूमी ऋणी आहे.माझे म्हातारपण कसे असेल ह्या भयावह प्रश्नाला संजीवन चे उत्तर आहे.


                                   योग- क्षेमं ­वहाम्यहम.”
 संजीवन डोंगर माथ्यावर आहे आणि आशाताई तिथेच असतात ,त्यांच्या आठवणीने एक समर्थ उक्ती सहजच ओठावर येतात "आशा डोंगरी राहते योग क्षेम जेष्ठांचा वाहते "आशा शुभा आणि अशाच अनेक दैदिप्यमान मातृकांना माझे कोटी कोटी प्रणाम.
          शशांक रांगणेकर

              मुंबई
               
९८२१४५८६०२