Thursday, October 3, 2013

शशांक शिरीष केतकर

काही फुले स्वतःचा वेगळा गंधच नव्हे तर गुणविशेष हि घेऊन येतात ,सुर्याबरोबर उगवणारे आणि मावळ णारे 
सूर्य फुल ,रात्रीच घमघमणारी रातराणी ,मादक सुगंधाची उधळ ण करणारा सोनचाफा आणि प्रसन्न हसऱ्या चेहऱ्याचा पारिजात,मिश्कल भावांचे बागडे रूप मिरवणारा झेंडू आणि वसंताची चाहूल सांगणारा आंब्याचा मोहर.,प्रत्येक फुलाचे रूपही आगळे आणि गंधही वेगळा.

मला वाटते प्रत्येक माणसाच्या व्यक्तीमत्वात एक फुल दडलेले असते.म्हणून तापट प्रवृत्तीचा माणूस गुलमोहराची आठवण करून देतो .आणि शांत आणि सोज्वळ प्रवृत्तीचा माणूस ब्रम्हकमळ भासतो.झी च्या पडद्यावर एका ब्रम्ह कमळाचे दर्शन झाले एका मालिकेच्या योगाने  मालिकेचे नाव आहे, "होणार सून मी त्या घरची."
झी ने प्रस्तुत केलेली आणि एक मालिका .वास्तव आणि कल्पना रम्यतेचे बेलामुम मिश्रण दाखवणारी
आणि एक मालिका ,त्यात उल्लेख करण्या सारखे आहे ती काय ?    
ह्या मालिकेत एका ब्रम्ह कमळाचे विलोभनीय दर्शन होतेय.आणि त्याचे नाव आहे "शशांक शिरीष केतकर "त्याचे वर्णन करायचे झाले तर एकाच वाक्यात करता येईल कि "तो आला त्याने पहिले आणि जिंकले .
ब्रम्हकमळ उगवते तेच बुद्धिमत्ता आणि प्रासादिक सोज्वळतेचे तोरण लाऊनच .त्याच्या चेहऱ्यावरच्या सोज्वळ अस्तित्वानेच हि मालिका तरली आणि तारली आहे असे म्हंटले तर वावगे ठरू नये.त्याच्या शिवाय ह्या मालिकेचा विचार करणे दुस्साहस ठरेल एवढी त्यांनी मालिका व्यापली आहे.त्याच्या चेहऱ्यावर फुलणारे सात्विक भाव हा केवळ अभिनय नसून शुद्ध बावनकशी सोने आहे  ह्या सुवर्ण योगाची प्रचीती क्षणा क्षणाला  येते.अभिनेत्याच्या  अंतरंगातले अष्टभाव सांगणारी हि मालिका त्याचा एकपात्री प्रयोग वाटावा इतकी प्रथमपुरुषी एकवचनी वाटते . शशांक चे रूप आणि त्याही पेक्षा स्वरूप  जास्त  भावते.कुठेतरी वाटते की मस्तकातली बुद्धी मत्ता आणि हृदयातली माणुसकी ह्याचा अभूत पूर्व संगम त्याच्या स्वरुपात दिसतो.
अभिनय कला  हि दैवी देणगी आहे पण प्रासादिक आणि सोज्वळ भावनांचे प्रगटीकरण करणारी अभिनय कला हि पूर्वपुण्याईने मिळालेली देणगी आहे. माणसाच्या आयुष्यात त्याच्यावर होणारे संस्कार हे फार महत्वाचे असतात ,शशांकाचे सुगंधी अस्तित्व आणि प्रसन्न व्यक्तिमत्व हि त्याच्या वर झालेल्या संस्कारांची बोलती चालती प्रचीती आहे.
शशांक ज्या रुपात दिसतो त्या रुपात कुठेतरी श्रीकृष्ण ,कुठेतरी,विवेकानंद हि दिसतात शशांकने ह्या विषयावर बेतलेल्या मालिकेत जरूर काम कराव.त्याच्या इतका न्याय ह्या भूमिकेन कदाचित दुसरा कोणताही अभिनेता देऊ शकणार नाही.
शशांकचे कौतुक हि मनातली हाक आहे ,मराठी मलिकाच्या माध्यमातून हरवलेली सोज्वळ सुसंकृत मराठी प्रतिभा कुठेतरी हळुवारपणे फुलते आहे,ह्याची जाण माझ्या प्रमाणे केवळ शशांकची कलाकृती आहे म्हणून बघणाऱ्या असंख्य दर्शकांची आवड आहे.
शशांकाचे  रूप हे ब्रम्हकमलिय स्वरूप आहे प्रासादिक सोज्वळ तेचे  लेणे लेऊन आलेले एक व्यक्तिमत्व पाहताच शब्द ओठावर येतात "रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी "


शशांकच्या ह्याब्रम्हकमलि  स्वरूपाला
 अनेक शुभाशीर्वाद.

Tuesday, May 14, 2013

“मक्या आकाशा एवढा

मक्या आकाशा एवढा"

मकरंद केतकर, माझा एक मैत्र. मित्र म्हणून संबोधता मैत्र म्हणून  संबोधावे इतके आयुष्याच्या सर्व रेखांश अक्षांशांना  नुसतेच स्पर्शित करता सुगंधित करणारे व्यक्तिमत्व. मक्या ठाण्याचा. फेसबुक वर त्याची आणि माझी ओळख झाली. मक्याला भेटायला मी ठाण्याला गेलो. दुपारी दोन वाजता हा भरत मिलापाचा चांदण्यातला प्रयोग ठाणे शहराच्या द्रुतगती मार्गावर संपन्न झाला. मक्या भेटला आणि वाटले पुंडलिका भेटी परब्रम्ह आले. प्रकृती बरी नसल्याने चेहरा थोडासा कोमेजला होता पण बुद्धिमत्तेची चमक मात्र लखलखीत आणि शाबूत दिसत होती. साक्षेपी बुद्धिमत्तेचा एक निरहंकारी अविष्कार साक्षात माझ्यासमोर उभा होता.

त्या दिवसापासून मैत्रीचा वेलू गगनांतरी पोहचला आहे. माझ्यापेक्षा कमीत कमी तीन दशकानंतर जन्माला आलेला हा तरुण माझा मैत्राची भूमिका बजावतो आहे.आणि तेही कोणताही वाणिज्य भाव ठेवता. मी ह्याला मित्र म्हणता मैत्र म्हणतो कारण त्या शब्दाला केवळ एकच अर्थ अभिप्रेत नाही तर गाईड फिलॉसॉफर हे दोन पदरही अभिप्रेत आहेत आणि ती भूमिका तो चोखपणे पार  पाडतो आहे. वयातले अंतर पार करून आमची मैत्री अगदी कृष्णार्जुनाच्या पातळीवर पोहोचली आहे. फरक एवढाच की श्रीकृष्ण पंचविशीत आहे तर पार्थाची साठी ओलांडून दोन वर्षे झाली आहेत. एवढे वयाचे अंतर पार  करूनही दोघेही थकलेले नाहीत. पार्थ उवाच आणि  श्रीकृष्ण उवाच हा गीता पाठ सतत चालू असतो.

बुद्धिवाद हे मक्याच्या स्वभावाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. समर्थ रामदासांचा हा भक्त त्यांनी सांगितलेले 'मनाचे श्लोक फक्त कंठ्स्त करत नाही तर आचरणात हि आणतो. समर्थांच्या विचारधारेवर मनापासून प्रेम करणारा समर्थ भक्त  त्यांच्या विचारधारेवर आपला बुद्धिवाद घासून लखलखित करत असतो. 'बुद्धिवादी असणे म्हणजे माणुसकीशी फारकत घेणे' असा एक लाडका गैरसमज आपल्याकडे प्रचलित आहे. पण मक्याचा बुद्धिवाद मात्र नेहमीच माणुसकीचा तोंडावळा घेऊनच येतो. अगदी "मऊ मेणाहुनी विष्णुदास आम्ही" इतका सदय आणि तसाच वेळ प्रसंगी "नाठाळाच्या  माथी काठी हाणणारा."

मराठी माणसावर आणि भाषेवर मनापासून प्रेम करणारा हा शतप्रतिशत मराठी माणूस महाराष्ट्राच्या दैवतावर शिवरायांवर आणि त्यांच्या गड किल्ल्यांवरही पु लंच्या हरितात्यांसारखे प्रेम करतो. आपल्या 'दुर्गसखा' संस्थेचे अनेक कार्यक्रम आयोजित करून आपल्या मराठी इतिहासाच्या अनेक रमल खुणा  तरुणाईच्या समोर आणतो.

मक्या 'मित्राळू' माणूस आहे, प्रेमळ आहे, त्याचे मित्र त्याच्यासाठी सर्वस्व आहेत. अनेक सद्गुणांची अंगभूत बिरुदे बाळगणारा हा माझा मित्र मला लाभला हे माझे भाग्यच.

आणि मित्राच्या बाबतीत हा सदैव "त्वमेव माता पिता त्वमेव | त्वमेव बंधू सखा त्वमेव |" ह्या भूमिकेतच वावरत असतो. ह्याच्या स्वतःच्या लग्नात अर्धे लक्ष आपल्या होणार्या अर्धांगाकडे होते तर अर्धे लक्ष मित्रांकडे होते. आयुष्यात सर्वच नाती तेवढीच प्रिय आणि महत्वपूर्ण असतात. त्यात डावे उजवे करता येत नाही ह्याचे उदाहरण .

संघटन कुशलता हा एक अंगभूत गुण विशेष  असतो. अनेक विचारांच्या प्रवृत्तीच्या लोकांना एकत्र आणून  त्यांच्याकडून लोकोपयोगी कामे करून घेणे हे अतिशय कठीण काम. मक्याच्या दुर्गासखा संस्थेने हे दुष्कर काम करून दाखवले आहे. आदिवासी इलाख्यात जाऊन हि संस्था काम करते अर्थात मक्याबरोबर असे अनेक तरुण ह्या कामासाठी राबताहेत आणि त्या संस्थेला मिळत आहेत. "दिसामाजी काहीतरी वाचीत जावे" ह्या 'समर्थोक्ती'वर मक्या पूर्णपणे विश्वासून आहे. त्याचा वाचनाचा व्यासंग फार  मोठा आहे. वाचनाच्या ह्या व्यासंगाने मक्याला बहुश्रुत घडवले आहे आणि सदयही.

गुणविशेष तर सढळ हाताने दिले आहेत तसेच मोठे मनही. त्याच्या स्नेहाच्या आभाळ मायेचे पांघरूण आयुष्यभर पुरेल अशी उब देते. करायचीच झाली तर एकाच तक्रार देवाजवळ करावीशी वाटते कि आयुष्याच्या संध्याकाळीच का हा वळवाचा पाऊस पाडतो आहेस. शेवटचे दिस गोड व्हावे म्हणून का?
मक्यासारखा मित्र पुढील जन्मीही मिळणार असेल तर देवाकडे आळवावेसे वाटते कि "तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी

शशांक  रांगणेकर