Monday, August 13, 2012

दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो

दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो
सगुण परमेश्वराची आराधना करणे हि सामान्य माणसाची उपासना पण पर्वत शिखरावर दऱ्या खोऱ्यात निसर्गाच्या सानिध्यात परमेश्वराला निर्गुण रुपात पाहणे हे फक्त योग्यालाच शक्य असते,निसर्गा कडे चला हा संदेश घेऊन ,तुमच्या कडे आलाय एक योगी नाव "सगुण भडकमकर"
सगुण हा खऱ्या अर्थाने पर्यावरण वादी आहे.निसर्गाच्या कुशीत जाऊन एकदातरी आभाळमाया अनुभवल्या शिवाय,शिवाय रान वारा फुफ्फुसात भरून घेतल्या शिवाय शहरी आयुष्याला पर्याय नाही हे आजकाल सर्वांनाच पटते आहे ,
सगुण ने आपल्या अथक परिश्रमाने मुरबाड जवळ एक मय सभा निर्माण केली आहे ,शत प्रती शत पर्यावरण वादी बांध काम,निसर्गाचे रौद्र रूप दाखवणारा तर कधी कधी अलुगुजासारके मंजुळ स्वर घुमावणारा रान वारा,हिरव्याकंच हिरवळीची शेलारी पांघरलेली सवाष्ण दरी आणि सोनेरी प्रकाश रेखा पसरवणारे कोवळे उन ,डोंगरांना डोळे मिचकावत मिचकावत ढुश्या देत देत पाळणारे ढग आणि इदं न मम म्हणत पर्वतावरून कोसळणारे जल प्रपात सारच काही काव्यमय ,सगुणाच्या ह्या प्रकल्पाचे नावच आहे हिरवे स्वप्न,खरोखर असे वाटते कि आयुष्यात एकदातरी निसर्गाचे हे मनमोहक रूप डोळे भरून बघावे ,एकदातरी तो पश्चिम वारा फुफ्फुसात भरून घ्यावा आणि ,शरीराचा रोम न रोम पुलकित करणारे निसर्ग स्पर्श अनुभवावे ,कदाचित हा तेजोमय स्पर्शच मनावरची काजळी पुसून उर्वरित आयुष्य लखलखीत करेल ,हेव्या दाव्याचे रुपया पैश्याचे ,देण्या घेण्याचे जग क्षण भर विसरता येईल आणि तो क्षण भरचा अमृत स्पर्श उर्वरित आयुष्य सुगंधित करेल.
सगुण हा एक उत्तम प्रकल्पक आहे विज्ञान आणि प्रकृती च्या हातात हात गुंफून त्याने हा प्रकल्प रेखाटला आहे ,आजच्या माणसाच्या गरजा आणि त्या गरजांची पूर्तता ह्यांची उत्तम सांगड त्यांनी इथे घातली आहे.
शून्यातून विश्वाची निर्मिती करताना शून्यालाच शरण जावे लागते ,आदि अंत जिथे संपतात ते शून्य ,सागुंच्या ह्या शून्यात सर्जनाचा एक आगळावेगळा अविष्कार आहे ,,सगुण ची माहिती त्याच्या वेब साईट वर नक्कीच मिळेल पण निर्गुण रूपातल्या सगुण ला पहायचे
असेल तर पळू लाच जावे लागेल ,कारण ते भावांकन शब्दात करण्याचे सामर्थ्य माझ्या तरी शब्दात नाही.
पाळूहून निघताना संध्याकाळ रात्रीकडे सरकत होती निसर्गाचे तेजोरूप मनातून निसटत नव्हते ,,एका निर्गुण स्वरूपी सगुण मनात रुजला होता ,त्याची अथक मेहनती वृत्ती ,आणि त्याच्या रोमारोमात प्रगट णारे निसर्गायण ,साऱ्याची रानभूल मनावरून उतरली नव्हती ,त्या वेळी सागुंची आठवण दोन ओळीत आली "दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो."
निसर्गाच्या ह्या सगुण रुपाला मैत्रयाणाचे लक्ष लक्ष अभिवादन
शशांक रांगणेकर
मुंबई ९८२१४५८६०२

2 comments:

Unknown said...

kya baat hai dear!!!! just keep it up ..no , dnt keep it up , increase the bar .

Pratibimb said...

सुंदर शब्दांकन