Thursday, December 27, 2012

“आशा डोंगरी राहते योग क्षेम जेष्ठांचा वाहते






“आशा डोंगरी राहते योग क्षेम जेष्ठांचा वाहते..
भारतीय संस्कृतीने स्त्रीच्या मातृ रुपाला आदराच्या अत्त्युच्य पदावर विराजित केले.आहे . आणि भारतीय नारींनी त्या आदराला पात्र असल्याची प्रचीती वेळोवेळी दिली आहे.अशाच एका मातृ रूपाचे पुण्यप्रद दर्शन नुकतेच झाले .आशाताई सावर्डेकर आणि त्यांचे "संजीवन आरोग्य धाम "गोमंतक भूमितले मातृ भावाचे एक लीळा चरित्र.
जग वेगाने चालले आहे ,आणि गोमंतक हि ह्या जगाचा भाग असल्याने त्या वेगाने होणारी पड झड इथेही पोहोचली आहे. त्या वेगाचा पहिला दृश्य प्रत्याघात म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीची होणारी वाताहात.खर म्हणाल तर इथे पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा हेच खरे .ज्यांचा वृद्धत्वाने शारीरिक वेग मंदावला आहे त्यांना चार भिंतीच्या आड कुढतच राहावे लागते ,सर्व काही असूनही वंचित राहावे लागते आणि आपण ओझे होतोय अशी एक जाळणारी जाणीव मनात घर करायला लागते ,आणि खरे म्हातारपण इथून जाणवायला लागते .ह्यात कोणाचाच दोष नसतो ,इच्छा असूनही तरुण मुले वृद्धांबरोबर वेळ घालवू शकत नाही कारण जीवघेण्या स्पर्धेच्या जगात ती हि भरडली जाताहेत , वाढत्या महागाई मुळे सगळ्याच जणांना अर्थार्जन करावे लागते आहे जेष्ठांकडे लक्ष द्यायला इच्छा असूनही तरुण मंडळी वेळ देऊ शकत नाहीत, चार भिंतींच्या आड घर खायला उठते ,आणि मग वाटू लागते कि दीर्घायुष्य हा शाप आहे.शतायुषी भव हा आशीर्वाद नाही आणि तसे सांगणारी उपनिषदे हि फोल आहेत. समाज जीवनात जेव्हा अशी वादळे  घोंघावतात तेव्हाच संत प्रवृत्ती जागृत होते .संत काही वेगळे नसतात ते सर्व सामान्य माणसांसारखेच असतात फक्त त्यांच्यात जागृत होतो सत प्रवृत्तीचा साक्षात्कार ,आणि असे संत भारत भूमीत अनेक आहेत आणि अव्याहत निर्माण होणार आहेत
.
तुकोबांचे एक वचन आहे " जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले ....... देव तेथेचि जाणावा , हि जाण घेऊन आशा ताई नि आपले संजीवन आरोघ्याधाम सुरु केले 'आणि आज त्याचा वेलू गगनंतरी गेला आहे
.
आशा सावर्डेकर एक सुशिक्षित गोमंतकीय कन्या ,तिचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबापुरीत झाले पण आपली कर्म भूमी गोयच्या मातीतच आहे त्यांनी पक्के ठरवले होते .माणसे घडवावी लागतात ,माणुसकीचा ओजस्वी मंत्र त्यांच्या मनात फुंकावा लागतो हि आशाताईंची धारणा .जो जगण्याची धारणा देतो तो धर्म आणि ह्या धर्मावर आशा ताई पूर्ण श्रद्धा ठेवतात
.
आशा ताई चे दिवंगत पती सैन्यात होते ,त्यांच्या बरोबरच्या सहजीवानाने केवळ दोन कन्यकांची नव्हे तर एका विजगेषु वृत्तीचीही प्राप्ती झाली. सैन्यात एकसंधता आली तर प्रत्येक सैनिक सेनापती सारखा वागतो हा त्यांना त्या सहजीवनातून मिळालेला एक मौलिक संदेश.आशा ताई ह्या संघ भावनेला मनापासून जपतात आणि जोपासतात हि , आणि त्यामुळेच त्यांच्या सहकारी त्यांच्या खांद्याला खांदा लाऊन काम करताहेत
.
श्रीमती .बोरकर ह्या एक जेष्ठ सहकारी , गोव्यातल्या एका कुटुंबातली गृहिणी पण आशा ताई च्या बरोबर काम करता करता ह्या शान्तेची दुर्गा कधी झाली ते कळलेही नाही ,आशाताई च्या बरोबर शुभा ताई हि तेवढ्याच तोलामोलाचे काम करताहेत आणि आणि महालक्ष्मी स्तोत्राप्रमाणे पुण्यादाई ठरणारी आशा,शुभा हि नामावली अशीच मांडवी जुवारी सारखी अव्याहत वाहत राहील .गोमान्ताकातले जेष्ठांचे जीवन फुलवत राहील
.
मला समाजाने काय दिले ह्या पेक्षा मी समाजाला काय देऊ शकतो ह्याचा सतत ध्यास धरून समाज कार्य करणाऱ्या सम विचारी कार्यकर्त्यांची सेना आशा ताई नि उभारली आहे ,आणि त्या सेनेचा प्रत्येक सैनिकही सेनापतीचे कर्तव्य लीलया पार पडू शकेल एवढे मनोबल निर्माण करण्याची किमया त्यांना प्राप्त झाली आहे
.
संस्था फक्त भावनेवर चालत नाही शिस्त आणि आर्थिक बळ ह्या दोन्ही पायावर त्या चालतात आणि वाढतात, ,सेवा वृत्ती तळागाळा पर्यंत पोहचली आहे. माणुसकीचा चेहरा घेऊन आलेली शिस्त हे संजीवनाचे ध्येय आहे .  नात्यांची छपरे उडताना गोमंतकीय वृद्धांसाठी संजीवन ठामपणे उभे आहे ,महिलांसाठी मायेची उब देणारे माहेर ,आणि पुरुषांसाठी "अजूनही तुमची उपयुक्तता संपली नाही असे ठाम पणे सांगणारे आपले घर
.
मदर तेरेसा ,सिंधुताई सकपाळ,ह्यांच्या तोडीचे काम संजीवन करते आहे ,आणि तेही ज्येष्ठांना ताठ मानेने उभे करत , वानप्रस्थ आश्रमाचे महत्व पटवत वाट चाल करते आहे , आज समाजाला अशा आरोग्याधामांची आवश्यकता आहे ,.तिथे समवयस्क आपल्या समस्यांचा मोकळे पणाने विचार करू शकतात आणि त्या मुळेच दोन पिढीत पसरणारी कटुता दूर होऊ शकते सामंजस्याची घट्ट वीण बांधली जाऊ शकते ,आणि समाज एक संध राहू शकतो ,शेवटचा दिस गोड व्हावा हि संकल्पना सत्यात उतरण्याची शाश्वती संजीवन देतो आहे
.
आशा शुभा आणि अश्या अनेकजणी चंदनासारख्या झिजत आहेत ,त्यांचा गोमंतकीय समाजच नव्हे तर हि भारत भूमी ऋणी आहे.माझे म्हातारपण कसे असेल ह्या भयावह प्रश्नाला संजीवन चे उत्तर आहे.


                                   योग- क्षेमं ­वहाम्यहम.”
 संजीवन डोंगर माथ्यावर आहे आणि आशाताई तिथेच असतात ,त्यांच्या आठवणीने एक समर्थ उक्ती सहजच ओठावर येतात "आशा डोंगरी राहते योग क्षेम जेष्ठांचा वाहते "आशा शुभा आणि अशाच अनेक दैदिप्यमान मातृकांना माझे कोटी कोटी प्रणाम.
          शशांक रांगणेकर

              मुंबई
               
९८२१४५८६०२

Friday, October 5, 2012

पुनरागमन

पुनरागमन
नीरद जकातदार एक विचारवंत लेखक.वय आणि शहाणपण बरोबरच वाढते म्हणतात ,सर्वसामान्य नियमही तसाच समाजाला जातो ,पण नियमाला सन्मानीय अपवाद हे असतातच.नीरद जकातदार हे त्या अपवादाचे एक सक्षम उदाहरण.विशी नुकतीच पार केलेल्या ह्या मुलाकडे एवढी वैचारिक समतोलता येतेच कुठून ,?केजरीवाल आणि पार्टी ह्या त्याच्या लेखात चिरंजीव नीरदने अतिशय सडेतोड पणे केजरीवाल ह्यांच्या कार्यप्रणालीच्या यशस्वीते बद्दल संशय प्रगत केले आहेत.आदर्श राज्य हे स्वप्न नव्हे तर एक सत्य ठरायला पाहिजे आणि सत्याला वास्तवाच्या अग्नीत तावून सुलाखून निघावे लागते हाच वास्तववादी संदेश नीरद ह्या लेखाद्वारे देऊ इच्छितो.
बुद्धी ,सचोटी देशभक्ती हि कोण्या एका वर्गाची अथवा व्यक्तीची मिरासदारी ठरूच शकत नाही ,भगवे वस्त्र परिधान करून संन्यासी वृत्ती येत नाही.
अहंकारी वृत्ती हि फार धोकादायक असते ..आपण संसदीय लोकशाही वर आधारित राज्यव्यवस्था अंगिकारली आहे आणि भारतीय राज्यघटना हि संसदीय राजकारणाचे मुलभूत प्रेरणा स्त्रोत आहे ,संसदीय राजकारण घटनेच्या चौकटीत राहूनच झाले पाहिजे.भारतीय राज्यघटना हे एक अमोघ शास्त्र आहे आणि कवचही आहे .कुठल्याही प्रकारचा बेशिस्तपणा अथवा सवंग लोक्प्रीयाते साठी केलेल्या मर्कट लीला फार दिवस जाता सहन करू शकत नाही. सार्वजनिक निवद्नुकातून ह्याचा संदेश ह्या देशाच्या सुबुद्ध जनतेने वेळोवेळी दिला आहे. नीरद च्या लेखातून हेच प्रतीत होते आहे .निर्स्च्या सरसर विवेक बुद्धीला ,आणि नित्यानित्य विवेकाला मनापासून धन्यवाद.नीरद तुझ्यासारख्या लेखकांची समाजाला खरोखर जरूर आहे.असेच लिहित जा..
बऱ्याच दिवसाने नीरद कडून काही सकस आणि विचारप्रवर्तक वाचायला मिळाले.गणेश विसर्जनाच्या वेळेला केलेल्या उत्तर पूजेच्या वेळेला तांदूळ घालतात आणि म्हणतात "पुनरागमानायचं "
बुद्धीदात्या गणेशाची सारासार बुद्धी दाखवणाऱ्या ह्या लेख बद्दल नीरद चे मनापासून कौतुक करावेसे वाटते ,वय आणि सारासार विवेक बुद्धीचे काही गणित असतेह असे नाही.


शशांक रांगणेकर

Saturday, September 22, 2012

रोहन वरद

रोहन वरद
निवडूंगचा फडा,खरोखर सुंदर दिसतो ,आणि जेव्हा त्यावर लाल रंगाचे फुल उमलते तेव्हा तर त्याचे सौंदर्य अप्रतिम असते ,मर्दानी सौंदर्याचे एक रुपकच,तंदुरुस्त ,शब्द वापरावा इतके सळसळते व्यक्तिमत्व ,खर्जात उमलणारे प्रमाथी स्वर गंध ,अगदी प्रथम पुरुषी एक वचनी रूप .नाव" रोहन गोखले".

वरद खरे ,सत्याचे आश्वासक अशीर्वाद्कारी रूप ,एक शुद्ध आणि सत्विक स्वर प्रणालीचे स्वर गुंजन.चौदा विद्यांचे तेज बुद्धीदात्याच्या आशीर्वादाने प्राप्त झालेले अल्ल्हाद्कारी सात्विक रूप . दोघेही तरुण नागपूरचे वैदर्भी कलाकारीचे उमलते भविष्य .

जीव आणि शिव हि संकल्पनाच ह्या जोडीने प्रत्यक्षात आणली आहे ,रोहनने लिहावे आणि वरद ने सूर द्यावेत ,शब्द रोहनचे असावेत आणि सूर वरदने फुंकावेत अशी एकात्मता.

केवळ गीतकार गायक अथवा संगीतकार ह्याच भूमिकेत हे वावरत नाहीत तर संपूर्ण संकलन आणि निर्मितीची जवाबदारी घेऊन नवोदित कलाकारांना मदतीचा हात पुढे करतात.कलाक्षेत्रात हि जोडी अतिशय मनमिळाऊ ,नम्र आणि तरीही परखड मत व्यक्त करणारी म्हणून प्रसिद्ध आहे .संगीताचे पूर्ण समज ,तरुणाई च्या आवडीची नस माहित असणारी ,आणि गीतकाराच्या शब्दांचा भावांचा गाभा अबाधित राखत त्य्च्याच स्वप्नाचे फुलोरे त्याच्या भावात फुलवणारी निर्मिती करणे हा ह्याचा हातखंडा खेळ आहे.

रोहन वरद ची कलाकारी बहु आयामी आहे कुणाला काय आवडते ह्याची त्यांना नेमकी जाण आहे ,हे खर तर फार कठीण काम पण ह्यांच्या नावातच सर्व काही दडले आहे पुढे जाण्याचा आशीर्वादच घेऊन ते आले आहेत.

श्रीकृष्ण हे आम्हा भारतीयांचे लाडके दैवत आम्हाला त्याची अनेक रूपे भेटतात दिसतात ,रोहन मधला गोकुळात रमणारा एक अनंग स्वरूपी श्रीकृष्ण आणि वरद मध्ये प्रतीत होणारा गीता सांगणारा सत्व आणि तत्व रुपी श्री कृष्ण दोनीही एकाचीच रूपे ,मैत्रायानाचे ह्या दोन्ही रूपाना हार्दिक शुभेच्छा

शशांक रांगणेकर मुंबई
९८२१४५८६०२

Tuesday, September 11, 2012

मयूर घोडे


मयूर घोडे
कवितेत काय असते आणि काय असायला पाहिजे हा प्रश्न अनेक कवींना पडतो ,पण मयूर घोडेला मात्र हा प्रश्न पडत नसावा किंवा पडणार हि नाही,कारण मयूर हा जात्याच कवी आहे ,मनात उमटणाऱ्या भावनांचे चित्रण सरळ आणि सोप्या शब्दात तो कवितेत . करतो,.उगाच शब्दांची आतिषबाजी नाही कि विचारांची सर्कस नाही जे वाटते भावपूर्ण अविष्कारात शब्दांकित करणारी त्याची कविता खरोखर मनाला भावते,
जे विचार ज्या भावना हृदयावर तरंगतात त्यांचे निरागस शब्दांकन मयूरच्या कवितेत उमटते.
कविता हि स्वयंभू असते किंबहुना असावी लागते नाही तर आज मी कविता लिहिणार आहे म्हणून केलीली कविता उपहार गृहातल्या जेवणा सारखे वाटते , पोट भरते पण मन भरत नाही,मयुराची कविता मात्र घरघुती स्वयंपाका सारखी मसाल्यांची चव नसूनही सुग्रास आणि पाचक वाटणारी ,सालस सुगरणीच्या अन्ना सारखी.
कवितेच्या नावाखाली शब्दातले बरेच कागदी ताबूत नाचवले जातात पण भाव नसल्याने ते दिखावटी आणि निर्जीव वाटतात.
कविता हि उपजते कवी मनातल्या भावनांना ती जन्माला घालते ,आणि फक्त शाब्दिक वेणा सरस आणि सकस कवितेला जन्म देऊ शकत नाही .
मयूर हा एक तरुण कवी आहे त्याच्या कवितेत निरागसता आहे ,नवथर भाव आहेत आणि स्वतःच्याच अनुभवाचे मासूम चित्रण आहे, आणि म्हणूनच रसिकाला ते भावते,रानात फुललेल्या मोहाच्या झाडा सारखे वाटते.विचाराची मुळे मनाच्या खोलवर मातीत रुजवणारी कविता .
प्रेमवेडा ,चांदणी .डोहाळे,वाट पोर्णिमा ह्या मयुराच्या कविता सांगतात एका तरुण मनाची कुजबुज जी ऐकाविशीही वाटते आणि आठवण करून देते एका रान फुलाच्या गुच्छ ची जो मोहक आहे आणि सुन्गाधीही आहे आपल्या नवथर प्रेमाची ओळख सांगणारा.मयूरच्या ह्या रानफुलांना मैत्रयाणाचे अनेक आशीर्वाद
शशांक रांगणेकर मुंबई
९८२१४५८६०२

Tuesday, September 4, 2012

स्मरण गाथा समीर पाठक

स्मरण गाथा समीर पाठक
स्मरणात तू असतेस तू नेहमीच अगम्य ,समीरच्या कवितेतली एक ओळ ,थेंबात तळे दाखवणारी आशय घन कविता,समीरच्या कवितेत कल्पनेचे उंचच उंच झोके दिसतात ,आठवणी आणि स्मरण ह्या दोन शब्दातले भावांतर ,समीरने अगदी बोलके केले आहे,नश्वर पासून ईश्वरा पर्यंतची उंची गाठणारी एक फक्त दोन ओळींची कविता,आठवणीतले येणे जाणे नेहीमीच असते ,पण स्मरणात तू अगम्य म्हणत मन आणि हृदय यातील फरक दाखवणारी कविता .फक्त दोन ओळींची ,मंत्र सारखी लहान असूनही महान ठरणारी.
समीरची कविता वास्तवाची धग नेहमीच जागती ठेवत कल्पनेचे पंख लाऊन हि वास्तवाच्या मातीतच आपल्या पावलांच्या रमल खुणा उमटवते"..
असेल कोणीतरी एखाद्या वळणावर हीही अशीच प्रेमाच्या नावाची शोध घेणारी कविता ,कोणीतरी केवळ आपल्यासाठीच आहे ह्याचा शोध घेणारी प्रथम पुरुषी एक वचनी कविता ,त्याच्यावर प्रेम करणाऱ्या ,त्याचे एकाकी पण संपवणाऱ्या कुणाचा तरी शोध घेणारी ,आणि तारुण्य सुलभ भावनांची शाई कागदावर शिंपडाव णारी एक नवथर कविता.,शब्दांची फुले नाजूक पणे गुंफणारी कविता.
कविता हे एक प्रभावी साधन आहे मनातल्या भल्या बुऱ्या साऱ्याच भावनांना प्रगट करण्याचे ,आपल्या साऱ्या कविता केवळ कागदी कपटे नव्हते कधीना कधी जिच्यासाठी त्या आहेत तिला त्या नक्कीच उमगतील ह्याची दुर्दम्य आशा बाळगणारी समीरची आशा लवकरच पुरी व्हावी हि ईश चरणी प्रार्थना.नाजूक शब्दांचे बिलोरी आरस्पानी रूप घेऊन फुलणारी समीरची कविता अशीच फुलो असे मैत्रायानाचे सप्रेम आशीर्वाद.
शशांक रांगणेकर
मुंबई
९८२१४५८६०२